नवी दिल्ली - विंडीजविरुद्धच्या झालेल्या पहिल्याच टी-२० सामन्यात टीम इंडियाने ४ गडी राखून विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे विंडीजला ९५ धावांवर रोखता आले. या सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी चांगली झाली नसली तरी कर्णधार विराटने अवघ्या १० धावा करत एक विक्रम रचला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटने दुसरा क्रमांक पटकावला आहे. विराटने आता मार्टिन गप्टिलला मागे टाकले आहे. गप्टिलच्या ७६ टी-२० सामन्यात एकूण २२७२ धावा आहेत. तर, विराटने ६८ सामन्यात २२८२ धावा ठोकल्या आहेत. विंडीजविरुद्धच्या झालेल्या पहिल्याच टी-२० सामन्यात विराटने १९ धावा केल्या आहेत.
या क्रमवारीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याने ९५ टी-२० सामन्यात एकूण २३५५ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक आणि न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्क्युलम हे खेळाडू क्रमश: चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.