शारजाह - कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. ही निवड मला अपेक्षित नव्हती, असे वरुणने सांगितले. वरुण चक्रवर्तीची प्रथमच भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.
बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत वरुण म्हणाला, "ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात माझी निवड होणे निश्चितच एक मोठी गोष्ट आहे. मला याची अपेक्षा नव्हती. या आयपीएलमधील माझे मुख्य उद्दीष्ट नियमितपणे संघाकडून खेळणे आणि संघाच्या विजयात योगदान देणे हे होते. मी आत्तापर्यंत चांगली कामगिरी करत आहे आणि मला आशा आहे, की भारतीय संघासाठीही मी ही कामगिरी सुरू ठेवेन. या निवडीसाठी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या निवड समितीचे मला आभार मानायचे आहेत."
ऑस्ट्रेलिया दौर्यावर, भारताला २७ नोव्हेंबर २०२० ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारताचा टी-२० संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती.