मुंबई - खेळाडूची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास, चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेच्या उपयोगाची मुभा देण्याचा विचार आयसीसीने करायला हवा, असे मत भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याने व्यक्त केले आहे. अजित आगरकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, कोरोनामुळे चेंडूला चकाकी आणण्यासाठी आयसीसीने लाळेच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
आगरकर गोलंदाजासाठी लाळेचा उपयोग किती हे पटवून सांगताना म्हणाला, 'फलंदाजांसाठी बॅटचे जितके महत्त्व आहे, तितकेच गोलंदाजांसाठी लाळेचे महत्व आहे.'
आयसीसीची ही बंदी ८ जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून लागू राहील. कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या तीन महिन्यात ही पहिलीच मालिका असणार आहे.
आगरकर पुढे म्हणाला, 'सामना सुरू होण्याआधी खेळाडूंची वैद्यकीय चाचणी होणार आहे. खेळाडू कोरोना संक्रमित नसतील तर लाळेचा उपयोग करू द्यायला हरकत नाही. हा माझा विचार असला तरी वैद्यकीय तज्ज्ञ यावर उत्कृष्ट मत मांडू शकतात.'
क्रिकेटमध्ये आधीच फलंदाजांचे वर्चस्व आहे. लाळेवर बंदी आल्यामुळे वेगवान गोलंदाजांची अवस्था आणखी दयनीय होईल असे भाकित आगरकर याने व्यक्त केले. तसेच त्याने सद्य स्थितीत मात्र आयसीसी क्रिकेट आणि आरोग्य समितीपुढे बंदी वाचून पर्याय नव्हता, अशी कबुली देत, चेंडूला चकाकी आणणे महत्त्वपूर्ण आहे. दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसताना समितीने हा कठीण निर्णय घेतला. इंग्लंडमधील मालिकेत काय घडते हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, अजित आगरकर याने १९१ एकदिवसीय सामन्यात खेळताना २८८ गडी बाद केले आहेत. तर २६ कसोटीत त्याने ५८ फलंदाजांना माघारी धाडले आहे.
हेही वाचा - वनडेमध्ये तिहेरी शतक की टी-20 क्रिकेटमध्ये दुहेरी शतक?...वाचा रोहितने दिलेले उत्तर
हेही वाचा - ''अवघ्या सात मिनिटात टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो''