सिडनी - भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि भारतीय संघ 'अ' गटातील अव्वल संघ म्हणून अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने भविष्यात अशा लढतींसाठी राखीव दिवस असायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.
सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौरने सांगितलं की, 'सामना न होता रद्द होणे हे दुर्दैवी आहे, पण त्यासाठी काही नियम आहेत आणि त्याचे पालन व्हायला पाहिजे. मात्र, भविष्यात उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस असायला हवे.'
उपांत्य फेरीत असा पेचप्रसंग निर्माण होईल, याची आम्हाला आधीपासून कल्पना होती. यामुळे आम्ही साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. याचे सर्व श्रेय संघातील खेळाडूंना जाते. आता अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाल्याने संघातील सकारात्मता आणखी वाढली असल्याचे हरमनप्रीतने सांगितलं.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पहिल्यांदाच पोहोचला आहे. हे आमच्यासाठी खूप मोठं यश आहे. अंतिम सामन्यात आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागले. यात आम्ही यशस्वी ठरलो. तर विश्वकरंडक जिंकणे कठीण नाही. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांची आतापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे, असेही हरमनप्रीत म्हणाली.
दरम्यान, भारताने अ गटात ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. तर इंग्लंडच्या खात्यात ६ गुण होते. भारताने साखळी फेरीच्या कामगिरीच्या जोरावर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला.
हेही वाचा - Women's T20 WC : आम्हाला तुमचा अभिमान... दिग्गजांकडून टीम इंडियावर शुभेच्छा वर्षाव
हेही वाचा - Women's T२० WC २०२० : पावसामुळे उपांत्य सामना रद्द, टीम इंडिया प्रथमच अंतिम फेरीत