सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या अव्वल क्रिकेटपटूंनी सोमवारी सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये सराव करण्यास सुरुवात केली आहे. या सरावात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल स्टार्क यांच्यासह इतर खेळाडूंनीही सहभाग नोंदवला. यावेळी संघाचा मुख्य फलंदाज स्टीव्ह स्मिथने आपली प्रतिक्रिया दिली. ''दोन महिने फलंदाजीपासून दूर राहून शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची काळजी घेतली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मी तंदुरुस्तीच्या सर्वोत्तम स्तरावर आहे'', असे स्मिथने सांगितले.
ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा फारसा परिणाम झालेला नाही. तेथे आतापर्यंत 7000 रुग्ण आढळले आहेत. स्मिथने एका वृत्तसंस्थेला सांगितले, “मागील वर्षाच्या तुलनेत मी तंदुरुस्तीच्या सर्वोत्तम स्तरावर आहे. मी गेल्या दोन महिन्यांत घरातील जिममध्ये खूप मेहनत घेतली आहे. ''
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यात आगामी मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यांचा नवा हंगाम ऑगस्टपासून सुरू होईल. ''मी खरोखर बॅटला स्पर्श केलेला नाही. मी फक्त स्वत: ला तंदुरुस्त, मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो'', असेही स्मिथने सांगितले.