हैदराबाद - दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाच्या (सीएसए) तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंडमधील प्रशिक्षण शिबिरात सामील होण्यापूर्वी ही चाचणी करण्यात आली. या तीन सदस्यांमध्ये एक सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. या शिबिराची सुरुवात 27 जुलैपासून प्रिटोरियामध्ये होईल.
सीएसएने म्हटले, "आमचे तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जे पॉझिटिव्ह आढळले आहेत ते 10 दिवसांसाठी क्वारंटाईन असतील. ते प्रशिक्षण शिबिरात भाग घेणार नाहीत."
"त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. आमचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. वैद्यकीय पथकाने हिरवा कंदील दिल्यानंतरच सर्व खेळाडू प्रशिक्षण आणि खेळण्यासाठी येतील", असेही बोर्डाने सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे सीएसएने खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांच्या 34 चाचण्या केल्या. 16 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुसर्या प्रशिक्षण शिबिरापूर्वी त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात येईल.