पठाणकोट - क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला आणि हत्येप्रकरणी आंतरराज्य टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली. डीजीपी दिनकर गुप्ता म्हणाले, ''१९ ऑगस्टच्या रात्री जिल्हा पठाणकोटच्या पी. एस. शाहपूरकांडी येथील थेरियल गाव प्रकरणात अन्य ११ आरोपींना अटक होणे बाकी आहे.''
या हल्ल्यात रैनाचे कंत्राटदार काका अशोक कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा कौशल कुमारचा ३१ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. अशोक कुमार यांची पत्नी आशा राणी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर दोन जणांना मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आले.
या प्रकरणात त्वरित एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली होती. हे आरोपी टोळी म्हणून काम करत असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी, त्यांनी उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाबमधील विविध भागांमध्येही असे अनेक गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. या टोळीतील एका व्यक्तीच्या ओळखीसह फरार असलेल्या ११ जणांचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर, सुरेश रैनाने यंदाच्या आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे.