मेलबर्न - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून पराभवाची धूळ चारली आणि चार सामन्याचा मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनावर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री खुश आहेत. भारताचा हा विजय कसोटी मालिका इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकमधील एक विजय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
अॅडिलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यानंतर संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाकडे तुम्ही कसे पाहता? असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला. यावर शास्त्री यांनी, हा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा कमबॅकमधील एक विजय आहे, असे सांगितले.
भारताच्या विजयाची कोणी कल्पना देखील केली नव्हती
सामना संपल्यानंतर बोलताना शास्त्री म्हणाले की, माझ्या विचारानुसार हा विजय एक उदाहरण म्हणून पहिले जाईल. निश्चितपणे हा कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकमधील एक सामना आहे. तीन दिवसाआधी एक संघ जो ३६ धावांत ऑलआऊट झाला होता. तो संघ पुनरागमन करत विजय मिळवेल, याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. पण आमच्या खेळाडूंनी जिद्दीने पुनरागमन करत विजय साकारला.
पाच दिवस चांगली कामगिरी करणारा संघच ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो
भारतीय संघ जेव्हा अॅडिलेडवरुन मेलबर्नमध्ये दाखल झाला. तेव्हा मी संघातील खेळाडूंना सांगितले होते की, आपल्याला आपले प्रदर्शन उंचवावे लागेल आणि जिद्दीने मैदानात उतरले पाहिजे. अॅडिलेडच्या पराभवातून आम्ही सकारात्मक बाबी घेतल्या. याचा फायदा आम्हाला झाला आणि दुसरा सामना आम्ही एकतर्फा जिंकला. हा विजय आम्ही केलेल्या मेहनतीचा परिणाम आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये एक दिवस किंवा एका सत्रात चांगली कामगिरी केल्यानंतर विजय साकारता येत नाही. तुम्हाला पाचही दिवस चांगली कामगिरी करावी लागते. अशी कामगिरी करणारा संघच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात पराभूत करू शकतो, असे देखील शास्त्री यांनी सांगितलं.
हेही वाचा - रोहित संघात दाखल होण्यास सज्ज; 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी जिंकल्यानंतर विराटकडून अजिंक्यचे कौतुक, म्हणाला...