नवी दिल्ली - भारतीय संघाचे माजी खेळाडू मदन लाल यांनी म्हटले आहे, की आयपीएलच्या तेराव्या हंगामाबद्दल निर्णय फक्त तेव्हाच घेता येईल जेव्हा कोरोनाव्हायरसमुळे उद्भवलेली सद्यस्थिती सुधारली जाईल.
मदनलाल एका वृत्तसंस्थेला म्हणाले, “हे संकट टळले की क्रिकेट नक्कीच घडू शकते कारण प्रत्येकाला आवडणारा खेळ आहे. अगदी खेळाडूंनाही प्रेक्षकांसमोर खेळायला आवडते. मात्र, प्रेक्षकांशिवाय आयपीएल घेण्यास काही अर्थ नाही. परिस्थिती सुधारली की आणखी काही मालिका होऊ शकतात."
कोरोनामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पण सद्य स्थिती पाहता १५ एप्रिलनंतरही आयपीएल होण्याची शक्यता नाहीच, असे मत आयपीएलचे माजी चेअरमन राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंतचे सर्व व्हिसा रद्द केले आहेत. देशात मागील २४ तासांमध्ये ५९१ कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर २० लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात ५८६५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात १६९ जणांचा मृत्यू तर ४७८ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.