कोलकाता - आफ्रिकेविरूद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडिया बांगलादेशविरूद्धच्या अभियानाला सुरूवात करणार आहे. ३ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान तीन टी-२० तर, १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान दोन कसोटी सामने या संघामध्ये खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - डोक्यात हातोडा लागल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू
२२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि बांगलादेश संघामध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी तिकिटांचे दर खाली आणण्यात आले आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) स्टेडियमवरील प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी तिकिटांची किमान किंमत ५० रुपये ठेवली आहे.
सीएबीचे सचिव अविषेक दालमिया यांनी या गोष्टीची माहिती दिली. 'स्टेडियममध्ये जास्तीत जास्त लोकं कसं जमतील यासाठी तिकिटांची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. शिवाय, युवा क्रिकेटपटू हा सामना मोफतही पाहता येईल याची व्यवस्था आम्ही केली आहे. त्यामुळे ईडन गार्डनमधील तिकिटांची किंमत २००, १५०, १०० आणि ५० रुपये असेल', असे दालमिया यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, पगार वाढवण्याच्या उद्देशाने बांगलादेश क्रिकेट संघाने कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. संघातील सर्व खेळाडू संपावर गेले असून बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे पगारात वाढ करण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेवर संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत.