मुंबई - भुवनेश्वर कुमारने नेटमध्ये सराव करत संघात परतण्याचे संकेत दिले आहे. मात्र, अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात भुवीच्या दुखापतीमुळे संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने हॅट्रीक घेत संघाला विजय मिळवून दिला. जर भूवी 'फिट' झाला तर भुवी की शमी अशी चर्चा रंगली आहे. यावर सचिन तेंडुलकरने मत मांडले आहे. तो म्हणतो की, वेस्ट इंडिज विरुध्दच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने संघात असायला हवे.
भुवनेश्वर कुमार 'फिट' झाला असल्याची बाब संघासाठी आनंदाची आहे. भुवीने नेटमध्ये केलेला सराव पाहता, त्याच्यामध्ये आत्मविश्वास जाणवत आहे. तसेच वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल नेहमी भुवीच्या विरोधात खेळताना चाचपडतो. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुध्दच्या सामन्यात मोहम्मद शमी ऐवजी भुवी संघात असावा, असे सचिनला वाटते.
पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे तो सामन्यात गोलंदाजी करु शकला नाही. त्याची ही दुखापत गंभीर होती. यामुळे अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात भुवीच्या ठिकाणी शमीला संधी देण्यात आली. या संधीचे सोने करत शमीने या सामन्यात मोक्याच्या क्षणी हॅट्रीक नोंदवत भारताला विजय मिळवून दिला. शमीने या सामन्यात ४ बळी घेतले होते.