कोलकाता - कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय 'पिंक बॉल' कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशवर एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला. या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यातील विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली आहे.
हेही वाचा - Aus vs Pak : ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय, पाकिस्तानला एक डाव आणि ५ धावांनी चारली धूळ
या विजयासह भारताने अनेक विश्वविक्रम केले. घरच्या मैदानावर खेळताना भारताचा हा सलग १२ वा कसोटी मालिका विजय आहे. तसेच डावाच्या फरकाने सलग चार कसोटी सामन्यात विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी खेळाडू पॉन्टिंगला मागे टाकले. भारतीय कर्णधार म्हणून विराटने कसोटीत हे २० वे शतक ठोकले. त्याने कर्णधार म्हणून १९ शतके ठोकलेल्या पॉन्टिंगला मागे टाकले. याबाबतीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ याने कर्णधार म्हणून सर्वाधिक २५ शतके केली आहे. विराटने बांग्लादेशविरुद्ध १३६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतासाठी पिंक बॉल टेस्ट सामन्यात शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.