चेन्नई - भारतीय संघातील खेळाडूंचा, कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. यामुळे भारतीय संघाला उद्या (मंगळवार) पासून सरावाला परवानगी मिळणार आहे.
बीसीसीआयने आज (सोमवार) सांगितले की, 'चेन्नईमध्ये भारतीय संघाने क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. यादरम्यान, खेळाडूंची तीन वेळा आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात सर्वजण निगेटिव्ह आहेत. उद्या (मंगळवार) पासून पहिल्या सराव सत्राला सुरूवात करण्यासाठी खेळाडू मैदानात उतरतील.'
दुसरीकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देखील त्यांच्या सर्व खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे सांगितले आहे. यामुळे इंग्लंडचे खेळाडू देखील उद्यापासून सरावाला सुरूवात करतील.
दरम्यान, इंग्लंडचा संघ भारतीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पहिल्यांदा उभय संघात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. चेन्नईत या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
असे आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
पहिला कसोटी सामना – ५ ते ९ फेब्रुवारी – चेन्नई (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)
दुसरा कसोटी सामना – १३ ते १७ फेब्रुवारी – चेन्नई (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)
तिसरा कसोटी सामना – २४ ते २८ फेब्रुवारी – अहमदाबाद (दिवस-रात्र) भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरु होईल.
चौथा कसोटी सामना – ४ ते ८ मार्च – अहमदाबाद (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)
हेही वाचा - टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीची अर्थमंत्र्यांकडून दखल, म्हणाल्या...
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : मोटेरा स्टेडियम करणार प्रेक्षकांचे स्वागत