राजकोट - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू आज राजकोटला दाखल झाले. राजस्थानमधील कल्वर रोड येथील हॉटेल इम्पीरियलमध्ये टीम इंडिया थांबणार आहे. तर, ऑस्ट्रेलिया संघाची याग्निक रोडवरील हॉटेल इम्पीरियल येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा - ICC Awards : रोहित 'सर्वोत्कृष्ट' तर विराट 'स्पिरीट ऑफ क्रिकेट'
शुक्रवारी १७ जानेवारीला हा सामना खेळवण्यात येणार आहे. राजकोटमध्ये दाखल झाल्यानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. वानखेडे येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला दहा गडी राखून धूळ चारली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. यामुळे सारे भारतीय खेळाडूंचे तारे जमिनीवर आले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ५ वेळा १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. सर्वात पहिल्यांदा असा पराभव न्यूझीलंड संघाने केला आहे. १९८१ मध्ये न्यूझीलंड संघाने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती.