अहमदाबाद - गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने बडोद्याचा ७ गडयांनी पाडाव करत यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडूचे हे या स्पर्धेचे दुसरे विजेतेपद ठरले. २००७मध्ये २२ वर्षीय कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडूने सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जिंकली होती.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या तामिळनाडूने बडोद्याला २० षटकात १२० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात तामिळनाडूने ३ गडी गमावत १८व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयी संघाचा फिरकीपटू मनिमरन सिद्धार्थने बडोद्याच्या ४ फलंदाजांना माघारी धाडत सामनावीराचा किताब आपल्या नावावर केला.
हेही वाचा - महिला राष्ट्रीय कुस्ती : सर्वोत्कृष्ट कुस्तीपटूला मिळणार दीड लाखांची म्हैस!
फलंदाजीसाठी मैदानात उतरेल्या बडोद्याची सुरुवात खराब झाली. सलामीवीर निनाद राथवाला बाबा अपराजितने बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार केदार देवधरही वैयक्तिक १६ धावांवर बाद झाला. बडोद्याचा संघ २८ धावांवर असताना स्मित पटेल (१) आणि भानू पानिआ (०) हे फलंदाजही माघारी परतले.
विष्णू सोलंकीचे अर्धशतक हुकले -
अवघ्या ३६ धावांवर ६ फलंदाज बाद झाले असताना अतित शेठ आणि विष्णू सोलंकीने संघाला सावरले. अतितने २९ धावांचे योगदान दिले. तर, विष्णूने ५५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह ४९ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात विष्णू धावबाद झाला. तामिळनाडूकडून सिद्धार्थव्यतिरिक्त अपराजित, सोनू यादव आणि मोहम्मद यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.
बडोद्याच्या १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूने चांगली सुरुवात केली. सलामीवीर हरी निशांतने ३५ धावा केल्या. मेरीवालाने एन. जगदीशनला बाद करत बडोद्याला पहिले यश मिळवून दिले. या दोघानंतर बाबा अपराजित (२९) आणि शाहरुख खानने (१८) नाबाद खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बडोद्याकडून अतित शेठ, मेरीवाला आणि बाबाशाफी पठाण यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.