मुंबई - सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००४ साली सिडनीमध्ये केलेली खेळी ही सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात शिस्तबद्ध खेळी होती. सचिनच्या या खेळीमधून लोकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी प्रेरणा घ्यावी. लोकांनी शिस्तबद्धता पाळून कोरोनाशी लढा द्यावा, असे आवाहन वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केले आहे.
सचिनने २००४ साली सिडनीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ४३६ चेंडूत ३३ चौकारांच्या मदतीने नाबाद २४१ धावांची खेळी केली होती. सचिनच्या याच खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ७ बाद ७०५ धावांचा डोंगर उभारला होता. पण, हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.
या विषयावर लारा म्हणाला, 'सचिन हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे, हे त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नाबाद २४१ धावांच्या खेळीतून सर्वांना शिकता येईल. त्याच्या या खेळीतून आपण कोरोनाच्या लढ्यासाठी प्रेरणा घेऊ.'
दरम्यान, सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावे आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांत ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ धावा केल्या, ज्यात ५१ शतकांचा समावेश आहे.
हेही वाचा - दादा सुसाट..१० हजार लोकांच्या जेवणासाठी घेतला पुढाकार
हेही वाचा - IPL Records : मुंबई इंडियन्ससाठी रोहितने नव्हे तर 'या' खेळाडूने लगावले सर्वाधिक षटकार