अहमदाबाद - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज बडोदा आणि तामिळनाडू जेतेपदासाठी भिडणार आहेत. बडोदा संघाने मैदानाबाहेरील वाद विसरून स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडू संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. तामिळनाडू संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा समतोल आहे.
बडोदा संघाने केदार देवधरच्या नेतृत्वात एकतर्फी विजय मिळवले आहेत. यात हरियाणाविरुद्धचा सामना अपवाद ठरला. विष्णू सोलंकीने अखेरच्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट मारत संघाला विजय मिळवून दिला होता. दरम्यान, स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच बडोदा संघाचा अव्वल फलंदाज दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या यांच्यात वाद झाले. यानंतर दीपक हुड्डाने पांड्यावर गंभीर आरोप करत स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर कृणाल पांड्याच्या वडिलांचे निधन झाले, यामुळे पांड्याने देखील स्पर्धा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.
दोन अनुभवी खेळाडू संघातून बाहेर गेल्यानंतर बडोद्याच्या इतर खेळाडूंनी समतोल राखत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे दिनेश कार्तिकच्या संघाने कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरी गाठली आहे. बडोद्याला तिसऱ्या विजेतेपदाची संधी असून उभय संघातील सामन्याला सायंकाळी सात वाजता सुरूवात होईल.
हेही वाचा - इंग्लंडचे भारत दौरे : दारुण पराभव ते २६/११ हल्ल्यातील शहिदांना वाहिलेला कसोटीविजय
हेही वाचा - आयपीएल भारतात होण्याची शक्यता, बीसीसीआयचे संकेत