नवी दिल्ली - डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता निवृत्तीनंतर रैना काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.
वंचित मुलांना शिकण्याची संधी मिळावी म्हणून सुरेश रैना आता जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा प्रचार करणार आहे. रैनाने जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या अनुभवाचा फायदा देण्याचा विचार रैनाने या पत्रात मांडला आहे.
रैना पत्रात पुढे म्हणाला, "मी १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझा ठसा उमटवला आहे. म्हणूनच मला माझा अनुभव पुढील पिढीला द्यायचा आहे. या भागातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील प्रतिभावान तरुण खेळाडू शोधण्याचा माझा मानस आहे. क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर ही अशी प्रक्रिया आहे जी व्यावसायिक वृत्ती, शिस्त आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करते आणि आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवून त्यांच्यात सुधारणा करते."
गेल्या शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी रैनाला खेळाच्या युक्त्या शिकवण्यासाठी आमंत्रित केले होते. आयपीएलच्या २०२०च्या मोसमात रैना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. आयपीएलचे तेरावे पर्व १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईत रंगणार आहे.