नवी दिल्ली - यंदाच्या वर्षी १५ ऑगस्टला दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच्यासोबत त्याचा साथीदार सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. हे दोन मातब्बर फलंदाज भारतीय संघाची शान होते. त्यानंतर आयपीएलमध्ये धोनी आणि रैनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, रैनाने या स्पर्धेतून माघार घेत सर्वांना निराश केले. आता तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे.
हेही वाचा - मोठी बातमी..पहिल्या हिंदकेसरी मल्लाचे निधन
आगामी जानेवारीत खेळवण्यात येणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा रैना भाग असणार आहे. तो उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. स्वत: रैनाने या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या फोटोत युवा फलंदाज प्रियम गर्गही दिसत आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने गर्गला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्त्वपद सोपवले आहे, तर युवा गोलंदाज कर्ण शर्माची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रैना गर्गच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसेल. १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल.