दिल्ली - फिरोजशाह कोटला मैदानावर गुरुवारी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या १६ व्या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर ५ गडी राखुन विजय मिळवला. या विजयासह हैदराबादच्या संघाने चेन्नईला मागे टाकत आयपीएलच्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे.
आतापर्यंत आयपीएलमध्ये हैदराबादने ४ सामने खेळले असुन त्यातील ३ सामने जिंकण्यास त्यांना यश आले आहे. तर एका सामन्यात सनरायजर्सला पराभवाचा सामना करावा लागला.
बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला ३७ धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे चेन्नई पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी फेकली गेली आहे. या क्रमवारीत पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
हैदराबाद, चेन्नई आणि पंजाब या तिन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण जमा आहेत. मात्र नेट रन रेटच्या जोरावर हैदराबादने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.