दुबई - भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात विराटने खराब कामगिरी केली. या कामगिरीनंतर, गावसकरांनी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का संबधित एक वक्तव्य केले. त्यानंतर अनुष्कानेही गावसकरांना खडे बोल सुनावले. आता या प्रकरणी गावसकरांनी आपली बाजू मांडली आहे.
गावसकर एका वृत्तसंस्थेला म्हणाले, "मी आणि आकाश चोप्रा समालोचन करत होतो. आम्ही हिंदी वाहिनीवर होतो. लॉकडाऊनदरम्यान आकाश कोणालाही योग्य सराव करण्याची संधी मिळाली नसल्याचे सांगत होता. ही गोष्ट अनेक खेळाडूंमध्ये जाणवली. पहिल्या सामन्यात रोहितला व्यवस्थित फटके खेळता येत नव्हते. त्याचप्रमाणे महेंद्रसिंह धोनीला मोठे फटके खेळता येत नव्हते. पहिल्या सामन्यात विराटही अपयशी ठरला. हे सर्व सरावाअभावी घडले.''
गावसकर म्हणाले, ''नेमका हाच मुद्दा मांडण्यात आला होता. विराटलाही सराव करण्याची संधी मिळाली नव्हती. इमारतीच्या आवारात अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव करताना तो दिसला. तेच तर मी म्हणालो. ती त्याला गोलंदाजी करत होती. बास इतकेच. जे मी व्हिडिओत पाहिले तेच फक्त सांगितले. यामध्ये मी तिला जबाबदार कुठे ठरवले? यात मी सेक्सिस्ट कमेंट कुठे केली?''
या सामन्यात पंजाबने बंगळुरूसमोर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. तर, विराटच्या नेतृत्वातील बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. विराटने शतक झळकावलेल्या पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन झेल सोडले. तर फलंदाजीतही विराट एका धावेवर माघारी परतला.