सिडनी - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची चौथी कसोटी खेळणार नाही. अशात जडेजाच्या जागेवर कोणत्या खेळाडूची भारतीय संघात वर्णी लागणार? याची चर्चा रंगली आहे. वॉशिग्टन सुंदर हा जडेजाची जागा घेऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.
सुंदरची निवड टी-२० संघात करण्यात आली होती. यामुळे तो ऑस्ट्रेलियात संघासोबत आहे. जडेजाच्या दुखापतीमुळे त्याच्या जागेवर सुंदरची निवड होऊ शकते. सुंदर गोलंदाजीसह फलंदाजी करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याची निवड पक्की मानली जात आहे.
जडेजाच्या जागेवर बीसीसीआय दुसऱ्या खेळाडूला भारतातून बोलावू शकत नाही. कारण ऑस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार, बाहेर देशातून येणाऱ्या व्यक्तिला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागते.
२१ वर्षीय सुंदरने १२ प्रथम सामने खेळले आहेत. यात त्याने ५३२ धावांसह ३० गडीही बाद केले आहेत. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप जडेजाच्या जागेवर कोणत्याही खेळाडूची घोषणा केलेली नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका २ सामन्यानंतर १-१ अशा बरोबरीत आहे. तिसरा सामना सिडनीमध्ये खेळवला जात आहे. जडेजाला या सामन्यात, फलंदाजीदरम्यान दुखापत झाली. यामुळे तो मालिकेतून बाहेर पडला. सिडनी सामन्यावर यजमान संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
हेही वाचा - IND vs AUS : दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत स्मिथने पटकावलं दिग्गजांच्या यादीत स्थान
हेही वाचा - भंडाऱ्यातील अग्नितांडवात 10 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू, शोएबने व्यक्त केली हळहळ