ख्राईस्टचर्च - इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्सला २०१९च्या विश्वकंरडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैदानात बाधा आणण्यासाठी बाद द्यायला हवे होते, असे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार ग्लेन टर्नर यांनी दिले आहे. अतिशय थरारक आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या २०१९ मधील विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडचा पराभव केला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वकरंडकावर नाव कोरले. मात्र, या सामन्यात घडलेल्या सुपर ओव्हरच्या थरारनाट्यानंतर, आयसीसीवर चौफेर टीका झाली होती.
टर्नर म्हणाले, "त्यांनी चुकीचा निर्णय दिला. क्षेत्ररक्षणात बाधा आणणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळाला. मात्र, तुम्ही आता अशा निर्णयात तिसऱ्या पंचांना समाविष्ट करून घेतले आहे. आशा करतो की भविष्यात असे निर्णय घ्यायला आपण सक्षम असू.''
या सामन्याच्या शेवटच्या ५० व्या षटकात इंग्लंडला विजयासाठी तीन चेंडूत ९ धावांची गरज होती. तेव्हा या षटकाच्या चौथ्या चेंडूवर २ धाव घेण्याचा प्रयत्नात असलेल्या बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी गुप्टीलने थ्रो केला. तो थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे पंचानी इंग्लंड एकूण ६ धावा दिल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.