लंडन - इंग्लंड संघाला विश्वकरंडक जिंकून देण्यात बेन स्टोक्सने मोलाची भूमिका पार पाडली. यामुळे स्टोक्सला मानाच्या 'सर' या उपाधीने गौरवण्यात येऊ शकते. अंतिम सामन्यात स्टोक्सने 98 चेंडूत नाबाद 84 धावा ठोकल्या होत्या. स्टोक्समुळेच हा सामना अनिर्णित राहिला.
त्यानंतर सुपर ओव्हर झाली आणि त्यामध्ये स्टोक्सने 8 धावा केल्या. यामुळे पुन्हा सुपर ओव्हरमध्ये सामना 'टाय' झाला. शेवटी चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता जाहीर करण्यात आले.
स्टोक्सने केलेल्या प्रदर्शनामुळे त्याला 'सर' ही उपाधी देण्यात येऊ शकते. इंग्लंड देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट स्टोक्सच्या प्रदर्शनावर जाम खुश आहेत. त्यांना एका मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. याचे उत्तर होय किंवा नाही यामध्ये देण्यास सांगितले.
या कार्यक्रमात जॉन्सन यांना स्टोक्स नाईटहुड होऊ शकतो का असे विचारले असता. त्यावर जॉन्सन यांनी होय असे उत्तर दिले. हा प्रश्न हंट यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनीही होय असे उत्तर दिले. त्यामुळे आगामी काळात बेन स्टोक्सला 'सर' या उपाधीने सन्मानित करता येऊ शकते.
दरम्यान, आतापर्यंत इंग्लंड संघाच्या 11 खेळाडूंना सर या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये शेवटची सर ही उपाधी माजी सलामीवीर अॅलिस्टर कुक याला देण्यात आली होती.