दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्सची पहिल्या दोन विजयानंतर सुरू झालेली पराभवाची मालिका अद्याप कायम आहे. दिल्लीविरुद्ध काल (शुक्रवार) खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानचा 46 धावांनी पराभव झाला. राजस्थानचा हा सलग चौथा पराभव ठरला. राजस्थानच्या पुढील सामन्यात स्टार खेळाडू बेन स्टोक्स संघात दाखल होईल, अशी चर्चा होती. पण तो रविवारी होणाऱ्या सामन्यात देखील खेळणार नसल्याची शक्यता आहे.
राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने, बेन स्टोक्सबद्दल माहिती दिली आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत होणार आहे. दरम्यान, बेन स्टोक्सचा क्वारंटाइन काळ शनिवारी पूर्ण होणार आहे.
स्टिव्ह स्मिथने सांगितले की, 'बेन स्टोक्सचा क्वारंटाइन काळ शनिवारी पूर्ण होणार आहे. पण त्याने अद्याप सरावाला सुरूवात केलेली नाही. यामुळे त्यांच्या संघातील समावेशाबाबत काही विचार केला जाऊ शकत नाही. त्यामुळे संघातील खेळाडूंनी आपली कामगिरी उंचवावी आणि योगदान द्यावं. खेळाडूंनी सकारात्मक खेळी करावी.'
दरम्यान, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत शारजाहच्या छोट्या मैदानात दिल्लीला १८४ धावात रोखले. त्यानंतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे राजस्थानने हा सामना ४६ धावांनी गमावला. दिल्ली कॅपिटल्ससोबत झालेल्या पराभवानंतर स्मिथने नाराजी व्यक्त केली आहे. दबावात रणनीतीनुसार खेळू शकलो नसल्याचे त्याने म्हटलं. राजस्थानचा संघ चार पराभव आणि दोन विजयांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा - IPL २०२० : पंजाबसमोर कोलकाताचे खडतर आव्हान
हेही वाचा - IPL २०२० CSK vs RCB : चेन्नईसमोर बंगळुरूचे कडवे आव्हान