ढाका - बांगलादेशचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने २००६ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणापासून शाकिबने अनेक विक्रम सर करत आपले नाव उंचावले आहे. उत्कृष्ट कामगिरी आणि मेहनतीच्या जोरावर तो आशियातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. अशीच एक कामगिरी शाकिबने आज सोमवारी करून दाखवली.
हेही वाचा - 'मास्टर-ब्लास्टर' सचिन तेंडुलकर पुन्हा ताडोबा दौऱ्यावर
आज रंगलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात शाकिबने नवा विक्रम सर केला. बांगलादेशमध्ये शाकिबच्या नावावर आता क्रिकेटच्या सर्व स्वरुपात मिळून ६००० धावा आणि ३०० बळींची नोंद झाली आहे. अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशचा पहिला क्रिकेटपटू ठरला. भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी भारतात ४००० पेक्षा जास्त धावा आणि ३०० बळी घेतले आहेत.
शाकिबने एका वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शाकिबने ५१ धावांचे योगदान दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजचा संघ १७७ धावांत सर्वबाद झाला.