कोलंबो - कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. अशा परिस्थितीतही श्रीलंकेने आयपीएलचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
आयपीएलचा तेरावा हंगाम २९ मार्च रोजी सुरू होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे तो १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर, देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत लांबल्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारतीय बोर्डाला आयपीएलच्या यजमानपदासाठी गळ घातली आहे.
“आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआय आणि त्याच्या भागधारकांचे ५०० मिलीयनचे नुकसान होईल. त्यामुळे दुसर्या देशात ही स्पर्धा आयोजित करुन नुकसानभरपाई होऊ शकते. आयपीएल श्रीलंकेत खेळवली गेली तर, भारतीयांना पाहता येईल. यापूर्वी ही स्पर्धा आफ्रिकेत खेळली गेली आहे. आम्ही भारतीय बोर्डाच्या उत्तराची वाट पाहत आहोत”, असे श्रीलंका क्रिकेट अध्यक्ष (एसएलसी) शम्मी सिल्वा म्हणाले आहेत.
सिल्वा पुढे म्हणाले, “जर भारतीय मंडळ येथे स्पर्धा खेळण्यास सहमती दर्शवत असेल तर आम्ही डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना सुविधा देण्यास तयार आहोत. श्रीलंका क्रिकेटसाठीही हे उत्पन्नाचे साधन ठरेल.” भारताच्या तुलनेत श्रीलंकेत कोरोनाची फार कमी प्रकरणे आढळली आहेत. आतापर्यंत या देशात केवळ २३० रूग्ण आढळून आले आहेत.