नवी दिल्ली - यंदाच्या आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) श्रीलंका क्रिकेटला बोर्डाला यजमानपदाची ऑफर दिली आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये एशिया कप होणार असून नियमांनुसार पाकिस्तानला यावेळी यजमानपदाची संधी आहे. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे ही स्पर्धा आयोजित करण्याचा धोका निर्माण झाला आहे. या आठवड्यात झालेल्या आशिया क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) बैठकीत पीसीबीने श्रीलंकेसमोर यजमानपदाचा प्रस्ताव मांडला .
पीसीबीचे म्हणणे आहे, की श्रीलंकेने पाकिस्तानला 2022 ला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद द्यावे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली गेली तर, या स्पर्धेमध्ये भारताचा सामावेश कठीण मानला जात होता. मात्र, आशिया चषकाविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. इतर देशांपेक्षा श्रीलंकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. खेळाडूंनी येथे सुरक्षा अटींद्वारे प्रशिक्षण सुरू केले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्या द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रवासावरील बंदीचे कारण देत भारताने ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 2010 नंतर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धा आयोजित केलेली नाही. मात्र, त्यांना यावेळी यजमानपद मिळण्याची संधी आहे. या महिन्याच्या शेवटी हा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.