नवी दिल्ली - पुढील वर्षी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत असमर्थ ठरला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे देश पर्यायी स्थळ म्हणून ठेवले आहेत. या स्पर्धेला अजून एक वर्ष बाकी आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा कोरोना विषाणूच्या साथीमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, "कोरोनामुळे श्रीलंका आणि यूएईला पुरुषांच्या टी-२० विश्वकरंडकासाठी 'बॅकअप वेन्यू' म्हणून ठेवण्यात आले आहे." २०२३ची विश्वकरंडक स्पर्धा भारतात होत असल्याने २०२१ची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा भारतात तर, २०२२ची ऑस्ट्रेलियात होणार असल्याचे आयसीसीने मागील आठवड्यात स्पष्ट केले होते.
कोणत्याही जागतिक स्पर्धेत बॅकअप कार्यक्रमासाठी एक मानक प्रोटोकॉल असतो. या अहवालानुसार, "प्रत्येक आयसीसी स्पर्धेचा बॅकअप वेन्यू मानक प्रोटोकॉलनुसार निश्चित केला गेला असतो. परंतु या वेळी कोरोनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व जास्त आहे."
भारतात सध्या ६ लाख ६१ हजार ५९५ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत १७ लाख ५१ हजार ५५६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. एकूण ४८ हजार ४० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात १३ ऑगस्टपर्यंत २ कोटी ७६ लाख ९४ हजार ४१६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६ लाख ४८ हजार ७२८ या गेल्या २४ तासात करण्यात आल्या आहेत. इंडिया मेडिकल रिसर्च कौन्सिलकडून जारी करण्यात आली आहे.