हैदराबाद - 'केरळ एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा शांताकुमारन श्रीशांत सध्या खूप खूष आहे. 2013च्या स्पॉट फिक्सिंग वादाच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतर श्रीशांत यावर्षी सप्टेंबरमध्ये परतणार आहे. लॉकडाऊन दिनक्रम, त्याचे कुटुंबीय, आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आणि भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्याची योजना यासंदर्भात संवाद साधण्यासाठी श्रीशांतने ईटीव्ही भारतला मुलाखत दिली. याशिवाय त्याने टीम इंडियासाठी नव्या जर्सी क्रमांकाचाही खूलासा केला.
श्रीशांतचे असे घालवले लॉकडाऊनचे दिवस -
श्रीशांत म्हणाला, "केरळमध्ये हवामान चांगले झाले आहे आणि सराव सुरू झाला आहे. परंतु येथे जोरदार पाऊस पडत आहे. येथे जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे आम्ही इनडोअर क्रिकेटचा सराव करत आहोत. रणजी करंडक हंगाम सुरू होणार आहे. आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू करण्याच्या विचारात आहोत. प्रशिक्षणाशिवाय घराची साफसफाई सुरू आहे. मी मुलांची काळजी घेत आहे. मी एक कुत्रा पाळला असून त्याला मुलांनी 'स्टार' असे नाव दिले आहे." तसेच त्याने 'श्रीशांत स्पोर्ट्स अकादमी' नावाच्या आपल्या नव्या अकादमीविषयी सांगितले. ही अकादमी सप्टेंबरमध्ये सुरू होईल.
टीम इंडियाकडून खेळण्याबाबत श्रीशांतचे मत -
श्रीशांत म्हणाला, "प्रत्येकाला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. ही वेगळीच भावना आहे. 2011च्या विश्वकरंडक स्पर्धेत जसे क्रिकेट सोडले तशाच पद्धतीने मला परत यायचे आहे. त्यामुळे मी केस वाढवत आहे. दाढी करणार नाही. पण मला लांब केस आणि चांगल्या फिटनेससह परत जायचे आहे. मला प्रथम श्रेणी सामन्यातील त्या पहिल्या चेंडूला सामोरे जावे लागेल. हे लवकरच होईल. कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये. मी माझ्या संघाला रणजी करंडक स्पर्धा आणि इराणी करंडक स्पर्धा जिंकून द्यायची आहे. भारतीय संघाची बस त्या मार्गाने आली तर तीसुद्ध मी पकडणार आहे."
36 क्रमांकाऐवजी 369 क्रमांकाची जर्सी घालणार श्रीशांत -
श्रीशांतने या संवादादरम्यान आपल्या नव्या जर्सीचा खुलासा केला. तो म्हणाला, "या वेळी मी 369 क्रमांकाची जर्सी घालणार आहे. 36 हा माझ्या जर्सीचा क्रमांक आहे आणि माझी मुलगी श्रीसान्विका 9 मे रोजी जन्माला आली. श्रीसान्विका म्हणजे लक्ष्मी. माझ्या बायकोचे नाव सर्वांना माहित आहे. नाईन सारखे ऐकायला येणारे नैन आणि तिचा वाढदिवसही 18 ला येतो. त्यामुळे माझा जर्सी क्रमांक 369 असेल."
आयपीएल खेळण्याची इच्छा -
श्रीशांत म्हणाला, "गेल्या वेळी मी आयपीएलमधून बाहेर पडलो तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. मी सर्वांना सांगू इच्छितो की मी त्या मैदानातून पळून जाणार नाही. तेथे परत यायचे आहे आणि लोकांनी माझ्या कामगिरीसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत.'' कोणत्या संघाकडून खेळणार असे विचारल्यावर श्रीशांत म्हणाला, ''मला सर्वजण हेच विचारत आहेत. मला पैसे नको, फक्त क्रिकेट खेळू द्या.''