मुंबई - स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिला. बीसीसीआयने श्रीशांतवरची आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केली. त्यामुळे तो आता भारतीय संघात परतण्यास फार उत्सुक आहे. या निर्णयानंतर श्रीशांतने अनेक मुलाखतीमधून विविध प्रतिक्रिया दिल्या.
हेही वाचा- आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी 'एक' वाईट बातमी
अशाच एका मुलाखतीमध्ये, श्रीशांतने आयपीएलमधील यशस्वी संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सबद्दल मत व्यक्त केले. 'मला सीएसकेचा संघ आवडत नाही', असे श्रीशांतने म्हटले आहे. याचे जेव्हा कारण विचारण्यात आले तेव्हा श्रीशांतने दिलेले उत्तर ऐकून सर्वजण संभ्रमात पडले.
'धोनी आणि श्रीनिवासन यांच्यामुळे नव्हे तर, या संघाच्या जर्सीचा रंग पिवळा असल्याने मला हा संघ आवडत नाही. आणि याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाचा संघही माझा नावडता आहे. मी राजस्थान रॉयल्स संघाचे तत्कालीन प्रशिक्षक पॅडी अप्टन यांना खुप वेळा मला सीएसके विरुद्ध खेळवण्याची विनंती केली होती. मला या संघाला हरवायचे होते', असे श्रीशांतने मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
२००५ मध्ये श्रीशांतने श्रीलंकाविरुद्ध नागपुर येथे एकदिवसीय पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्य़ा आहेत. आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केल्यानंतर, श्रीशांतने चाहत्यांचे आभार मानले होते. 'या निर्णयामुळे मी खूप खूष आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या हितचिंतकांना धन्यवाद देऊ इच्छितो. मी आता ३६ वर्षांचा आहे आणि पुढच्या वर्षी मी ३७ वर्षांचा होईन. माझ्या कसोटी कारकिर्दीत ८७ विकेट्स आहेत. माझे ध्येय आहे की, मला १०० विकेट्स घेऊन कारकिर्द संपवायची आहे. मला नेहमी विराटच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा होती', असे श्रीशांतने म्हटले होते.