नवी दिल्ली - जमैकाचा स्टार धावपटू योहान ब्लॅकने ट्रॅक आणि फील्ड क्षेत्रातील निवृत्तीनंतर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोड सेफ्टी विश्व टी-२० मालिकेचा प्रचार करण्यासाठी योहान भारतात आला असून त्याने यावेळी आपली इच्छा बोलून दाखवली.
योहान ब्लॅकने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकली आहेत. तो आपल्या निवृत्तीनंतर आयपीएल खेळू इच्छित आहे. याविषयी बोलताना ब्लॅक म्हणाला, 'माझ्याकडे ट्रॅक आणि फील्ड या क्रीडाक्षेत्रामध्ये अजून दोन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर मी क्रिकेटमध्ये येईन.
पण, मला वेस्ट इंडिजकडून खेळण्याची इच्छा नाही. मला फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये खेळायला आवडेल. मला भारतात एक फ्रँचायझी घ्यायला देखील आवडेल.'
तसेच त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे संघ आपल्या आवडीचे असून या संघासाठी मला मैदानात उतरायला आवडेल असे सांगितले. याशिवाय त्याने आपण विराट कोहली आणि एबी डिविलर्स यांचा चाहता असल्याचे सांगितले.
दरम्यान, भारतात सध्या रोड सेफ्टी विश्व टी-२० मालिकेचा प्रचार सुरू आहे. या प्रचाराकरिता योहान ब्लॅक भारतात आला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार असून यामध्ये सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारासारखे दिग्गज खेळाडू भाग घेणार आहेत.
हेही वाचा - पाकचा रझाक म्हणतो, 'बुमराह 'बच्चा', त्यांची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती'
हेही वाचा - VIDEO : १४ वर्षीय मुलीचा धोबीपछाड, मुलाला कुस्तीत मात देत जिंकलं पारितोषिक