नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी भारतात क्रीडा संस्कृती तयार करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. भारतातील लोक आणि संसदेतील काही सहकाऱ्यांना खेळाविषयी समज कमी असल्याचे रिजिजू यांनी सांगितले.
रिजिजू म्हणाले, ''भारतीय समाजाला खेळाविषयी फारसे ज्ञान नाही. मला माझ्या संसदेच्या सहकाऱ्यांची बदनामी करायची नाही, परंतु त्यांनाही खेळांविषयी समज कमी आहे. क्रिकेटबद्दल सर्वांना माहित आहे. समोरच्या संघाला पराभूत करावे लागते, हे ब्रिटीशांनी आपल्या मनात भरवले आहे. पण, त्याशिवाय कोणाला कसलेही ज्ञान नाही. प्रत्येकाला फक्त सुवर्णपदक हवे आहे.''
15 वर्षीय ज्योती कुमारीने मे महिन्यात वडिलांना सायकलवर बसवून आठ दिवसात 1200 किमीचा प्रवास केला होता. इंडियन सायकल फेडरेशनने तिला चाचणीची ऑफर दिली होती, मात्र ज्योतीने ती फेटाळून लावली.
तत्पूर्वी, श्रीनिवास गौडा आणि मध्य प्रदेशमधील रामेश्वर गुर्जर शर्यतीमुळे सोशल मीडियावर हिट झाले होते. या दोघांची तुलना ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्णपदक मिळविणा उसेन बोल्टशी केली गेली. त्यांनाही चाचणीसाठी बोलावण्यात आले होते.
रिजिजू म्हणाले, "भारतात क्रीडा संस्कृती तयार करू शकत नाही, याचा मला खूप त्रास झाला. अभिनव बिंद्राला बीजिंगमध्ये सुवर्णपदक मिळाले. आमच्या हॉकी संघाने मॉस्कोमध्ये सुवर्णपदक जिंकले. यामुळे आनंद मिळतो, परंतु अशा संधींसाठी सामूहिक प्रयत्न केले जात नाहीत. भारताकडे क्रीडा परंपरा आहे, परंतु दुर्दैवाने आपल्याकडे क्रीडा संस्कृती नाही. सुदैवाने 1996च्या ऑलिम्पिकपासून आतापर्यंत आपण पदक मिळविण्यामध्ये यशस्वी झालो आहोत, पण भारतासारख्या मोठ्या देशासाठी ते पुरेसे नाही.''