मेलबर्न - या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. शहरात आयोजित करण्यात आलेल्या दोन सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत स्टेडियममध्ये येणाऱ्यांना मंजुरी देण्यासाठी त्यांचे सरकार क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि टेनिस ऑस्ट्रेलिया यांच्याशी चर्चा करत आहे, असे व्हिक्टोरिया प्रांताचे पंतप्रधान डॅनियल अँड्र्यूज यांनी सोमवारी सांगितले. २६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग-डे कसोटी रंगणार आहे.
या सर्वोच्च क्रीडा स्पर्धांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटी आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा समावेश आहे. व्हिक्टोरिया राज्यावरील कोरोनाचे संकट गडद असल्यामुळे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला बॉक्सिंग-डे कसोटीचे आयोजन करण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते.
जुलैपासून लॉकडाउनचा सामना करत असलेल्या व्हिक्टोरियामध्ये एकूण देशापैकी कोरोनाच्या ७५ टक्के घटना घडल्या आहेत. तर एकूण मृत्यूंपैकी ९० टक्के मृत्यू या राज्यात झाले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये २६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, ८००पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.
अँड्र्यूज म्हणाले, "दर्शकांची सुरक्षित संख्या काय असेल, ते आम्हाला पाहावे लागेल. यावेळी ही संख्या काय असेल हे सांगणे कठीण आहे. जर हे ठिकाण सुरक्षित असेल, तर आम्हाला तेथे जास्तीत जास्त लोकांना बघायचे आहे.''