मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे साहित्य बनवणाऱ्या 'स्पार्टन' कंपनीविरोधातील लढाई जिंकली आहे. करार संपल्यानंतर, आपल्या नावाचा उपयोग करत असल्याचा आरोप सचिनने या कंपनीवर केला होता. मात्र, आता स्पार्टनने सचिनची माफी मागितली आहे.
ऑस्ट्रेलियातील फेडरल कोर्टात सचिनने हा दावा ठोकला होता. करारामधील नियमांचे पालन न करणे, ठरलेली रक्कम न देण्याचाही आरोपही सचिनने कंपनीवर केला आहे. 17 डिसेंबर 2018 नंतर स्पार्टन आणि सचिन यांच्यातला करार अधिकृतरित्या संपलेला आहे, यानंतरच्या कोणत्याही उत्पादनांसाठी कंपनी सचिनचे नाव वापरणार नाही, असे स्पार्टनचे संलाचक लेस गलाब्रेथ यांनी स्पष्ट केले.
“हा खटला संपवून या प्रकरणात मैत्रीपूर्ण तोडगा निघाल्यामुळे सचिनला आनंद झाला आहे”, असे सचिनची मॅनेजमेंट कंपनी एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे सीईओ मृण्मॉय मुखर्जी यांनी म्हटले आहे.