काठमांडू - दक्षिण आशियाई स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या सामन्यात यजमान नेपाळच्या संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. मालदिव विरुध्द झालेल्या सामन्यात नेपाळच्या गोलदाजांनी संपूर्ण संघ ११.३ षटकात माघारी धाडला. महत्वाची बाब म्हणजे, या सामन्यात एका सलामीवीरची १ धाव सोडून अन्य नऊ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
मालदिव आणि यजमान नेपाळ यांच्यात रंगलेल्या सामन्यात मालदिव संघाने प्रथम फलंदाजी केली. नेपाळच्या अंजली चांदच्या माऱ्यासमोर मालदिवचा संघ ११.३ षटकात सर्वबाद ८ धावांवर आटोपला. विशेष म्हणजे, सलामीवीर ऐमा ऐशाथने फक्त एक धाव काढली तर राहिलेल्या ७ धावा या अवांतर होत्या.
अंजलीने आपल्या ४ षटकाच्या स्पेलमध्ये ३ निर्धाव तर केवळ १ धाव देत ४ गडी बाद केले. तर सीता राणा मगर (२/०) आणि रुबीना छेत्री (२/०) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सुमन खाटीवाडा आणि करुणा भंडारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मालदिवचे लक्ष्य नेपाळने ७ चेंडूत पूर्ण केले. सलामीवीर काजल श्रेष्ठ (२) आणि रोमा थापा (५) नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, अंजलीने यापूर्वी याच स्पर्धेत शून्य धावात ६ गडी बाद केले होते. विशेष बाब म्हणजे अंजलीने दोन टी-२० सामन्यात १ धाव देत १० गडी बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
हेही वाचा - श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 'या' खेळाडूचे १० वर्षानंतर पुनरागमन
हेही वाचा - टीम इंडियाच्या गचाळ क्षेत्ररक्षणावर भडकला युवराज म्हणाला ही तर...