जोहान्सबर्ग - भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. पण, बीसीसीआयने कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे मालिका अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आफ्रिकेचा संघ आज कोलकाता-दुबई मार्गे मायदेशी परतला आहे. पण, मायदेशात पोहोचल्यावर आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ३ एकदिवसीय सामने खेळणार होता. धर्मशाला येथे होणारा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. त्यानंतर भारतामध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने, बीसीसीआयने उर्वरित दोन सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, या निर्णयाआधी आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यासाठी लखनऊमध्ये दाखल झाला होता. मालिका रद्द झाल्याने, आफ्रिका संघाला मुंबई आणि दिल्ली येथील कोरोनाचा प्रभाव पाहता, कोलकाता-दुबई मार्गे जोहान्सबर्गला पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. यानुसार आज आफ्रिका संघाला कोलकाता-दुबई मार्गे जोहान्सबर्गला पाठवण्यात आले.
दरम्यान, भारतातून मायदेशी परतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना केट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शौएब मांज्रा यांनी केल्या आहेत.
याविषयी मांज्रा यांनी सांगितलं की, 'खेळाडूंना आम्ही काही दिवस इतरांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. किमान १४ दिवस त्यांनी एकांतवासात जावे. स्वतःला, इतरांना आणि कुटुंबीयांना सुरक्षित राखण्यासाठी हा योग्य पर्याय आहे. या कालावधीत कोणातही कोरोनाची लक्षणे आढळल्यास आम्ही त्वरीत योग्य ते उपचार करू.'
चीनच्या वुहान शहरातून जगभरात वाऱ्यासारखा पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे ६ हजाराहून अधिक लोकांचा प्राण गेला आहे. जगातील १५० हून अधिक देशात या विषाणूचा फैलाव झाला असून दीड लाखांहून अधिक लोकांना यांची बाधा झाली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने उपाययोजना करत आहे.
हेही वाचा - 'ज्वालामुखीं'ची चढाई करणाऱ्या गिर्यारोहकाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
हेही वाचा - तब्बल ८ वर्षांपूर्वी सचिनच्या 'या' निर्णयाने क्रिकेटविश्व झाले होते भावूक!