नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाईल. या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौर्यावर येणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, दोन्ही संघांमध्ये पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाईल. या दौऱ्याबाबत सध्या तारीख व ठिकाण यावर काम सुरू आहे. २०२० टी-२० वर्ल्डकपपासून भारतीय महिला संघाने कोणताही सामना खेळलेला नाही.
हेही वाचा - क्रीडा अर्थसंकल्प : एका डोळ्यात ‘हसू’ दुसऱ्यात ‘आसू’
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही भारतात क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यामुळे हा दौरा महिन्याहून अधिक काळ होणार आहे. त्याशिवाय बायो बबलमुळे सर्व सामने फक्त एकाच शहरात खेळले जाऊ शकतात. दक्षिण आफ्रिका बोर्डाने आत्तापर्यंतच्या या दौऱ्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सध्या पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेची सांगता ३ फेब्रुवारीला होईल.
कोरोना विषाणूनंतर भारतीय महिला संघाची पहिली मालिका -
टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय महिला संघाची ही पहिली मालिका असेल. यापूर्वी अनेक खेळाडूंनी शारजाहमधील महिला टी-२० चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कोणत्याही संघाविरूद्ध कोणतीही मालिका खेळली नाही. त्याचबरोबर बीसीसीआयनेही महिलांच्या घरगुती क्रिकेट हंगामाची घोषणा केली आहे. हा हंगाम फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यापासून सुरू होईल.