लखनौ - अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारतावर विजय मिळवला. दुसरा सामना ६ गडी राखून जिंकत आफ्रिकेने तीन सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेला विजयासाठी अखेरच्या षटकात ९ धावांची गरज होती. आफ्रिकेने अखेरच्या चेंडूवर विजय साकारला.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा भारताने निर्धारित २० षटकात ४ बाद १५८ धावा केल्या. यात शेफाली वर्माने ३१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर ऋचा घोषने २६ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ४४ धावांचे योगदान दिले. आफ्रिकेकडून नानकुलुलेका मलाबा, शब्निम इस्माइल, नादिने डी क्र्लेक आणि एने बोश यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
भारताने दिलेले आव्हान आफ्रिकेने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. एनी बोस २ धावांवर बाद झाली. तिला गायकवाडने क्लीन बोल्ड केलं. यानंतर लिजेल ली आणि सूने लुस या दोघींनी आफ्रिकेचा डाव सावरला. दोघींनी दुसऱ्या गडीसाठी अर्धशतकी भागिदारी केली.
सुने लुस (२०) हिला दिप्ती शर्माने धावबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. लीने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. तिला लॉरा वोल्वार्डटने चांगली साथ दिली. राधा यादवने लिजेल ली हिला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. लीने ४५ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ७० धावाची खेळी केली. यानंतर लॉरा वोल्वार्डटने किल्ला लढवला. तिने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत संघाला विजय मिळवून दिला. लॉरा वोल्वार्डटने ३९ चेंडूत ७ चौकारासह नाबाद ५३ धावांची खेळी केली. तर नादिन ३ धावांवर नाबाद राहिली. उभय संघातील तिसरा सामना २३ मार्चला होणार आहे.
हेही वाचा - विराट सेनेचा कारनामा: २ वर्ष अजिंक्य राहत सलग ६ टी-२० मालिका जिंकण्याचा केला पराक्रम
हेही वाचा - Ind vs Eng: कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत केले 'विराट' विक्रम