जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आगामी आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. ३७ वर्षीय स्टेन सध्या क्रिकेटमधून विश्रांती घेणार आहे. ही विश्रांती निवृत्ती नाही, असे त्याने केलेल्या दोन ट्विटमधून समोर आले आहे.
हेही वाचा - जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड
आयपीएल-२०२० मध्ये स्टेन विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा भाग होता. "क्रिकेट ट्वीट .. यंदा आयपीएलमध्ये मी आरसीबीकडून खेळणार नाही. मी इतर कोणत्याही संघाकडून खेळण्याचा विचारही करत नाही. फक्त काही दिवस रजा घेत आहे. मला समजून घेतल्याबद्दल आरसीबीचे आभार. मी निवृत्त होत नाहीये", असे स्टेनने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले.
यंदा आरसीबीसाठी स्टेन खेळलाय फक्त तीन सामने -
तर, दुसऱ्या ट्विटमध्ये स्टेन म्हणाला, "मी इतर लीगमध्ये खेळणार आहे. मला काहीतरी करायला आवडेल. मी माझा खेळ सुरूच ठेवणार आहे. नाही, मी निवृत्त होत नाहीये. २०२१ चांगले असावे." स्टेनने यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीसाठी फक्त तीन सामने खेळले आणि फक्त एक गडी बाद केला. त्याने ऑगस्ट-२०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघासमवेत वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.