जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेच्या कर्णधारापदाची कमान फाफ डू प्लेसिस यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. याची पृष्टी आफ्रिका क्रिकेट मंडळाने केली आहे. विश्वकरंडक स्पर्धेमध्ये आफ्रिकेच्या संघाने खराब कामगिरी केल्याने, संघ गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर राहिला. यामुळे आफ्रिकेला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेच्या कर्णधारपदी फाफ डू प्लेसिसला कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, निर्धारीत षटकांच्या सामन्याचे नेतृत्व इतर कोणत्याही खेळाडूकडे सोपवण्यात येणार आहे. २०२३ साला पर्यंतची रणनितीनुसार आफ्रिका क्रिकेट मंडळाने धोरण अवलंबले असल्याचे, आफ्रिकी क्रिकेट मंडळाचे कार्यकारी संचालकांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यात पहिल्यांदा टी-२० मालिका खेळवण्यात येणार असून या मालिकेतील पहिला टी-२० सामना १५ सप्टेंबर रोजी धर्मशाळा मैदानावर होणार आहे. तर कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑक्टोंबर महिन्यात विशाखापट्टनच्या मैदानावर होणार आहे.