कोलकाता - माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीचे लहानपणीचे प्रशिक्षक अशोक मुस्तफी यांचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. लंडनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबात त्यांना एक मुलगी आहे.
मुस्तफी यांच्या कौटुंबीक सूत्रांनी सांगितले, "ते हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते आणि एप्रिलमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला."
मुस्तफी हे प्रख्यात दुखीराम क्रिकेट कोचिंग सेंटरचे प्रशिक्षक होते, जे नंतर आर्यन क्लब गॅलरीच्या अखत्यारीत आले. त्यांना एकेकाळी बंगाल क्रिकेटचे मूळ मानले जात होते. त्यांनी सौरव गांगुलीसह अनेक रणजी क्रिकेटपटूंना घडवले.
"मुस्तफी सर यांच्या निधनामुळे मी दु:खी आणि शोकग्रस्त आहे. क्रिकेटमधील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील", असे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष अविशेक दालमिया म्हणाले आहेत.
सुरुवातीच्या काळात गांगुलीच्या वडिलांनी त्याला मुस्तफी यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. तिथे गांगुली त्याचा मित्र संजय दास यांच्याबरोबर प्रशिक्षण घेत होता. गेल्या महिन्यात मुस्तफी यांची प्रकृती खालावल्यानंतर आणि गांगुलीने संजयसोबत त्याच्या उपचारांची व्यवस्था केली होती.