मुंबई - सध्या जगभरात कोणतीही क्रीडा स्पर्धा खेळवली जाईल अशी परिस्थिती नाही, आयपीएल तर विसरुनच जा, असे सूचक संकेत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे. तसेच त्यांनी सोमवारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतर याबद्दल काही सांगू शकेन, असं म्हटलं आहे.
सद्य घडीला कोरोनामुळे जगभरात भितीचे वातावरण आहे. जगात कोरोना रुग्णाची संख्या १८ लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर १ लाख ८ हजाराहून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशात कोरोनाचे ८ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर यामुळे मृत्यूची संख्या २५० पार झाली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र देशातील काही राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवल्यामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याविषयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच आयपीएल स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे सूचक संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितलं, 'बीसीसीआय सध्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. पण परिस्थितीच अशी उद्भवली आहे की, सांगण्यासारखे काहीच नाही. संपूर्ण जग थांबले आहे. सध्याची परिस्थिती पाहता मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशीच परिस्थिती राहिल असा अंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंना कुठून आणणार? ते प्रवास कसा करतील? सध्या जगभरात कोणतीही क्रीडा स्पर्धा खेळवली जाईल अशी परिस्थिती नाही, आयपीएल तर विसरुनच जा.'
केंद्राच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून -
केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. पण सद्य घडीला परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात अधिकृत माहिती येईपर्यंत आयपीएलबद्दल काहीही सांगण शक्य होणार नसल्याचेही गांगुली म्हणाले. मी सोमवारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतर याबद्दल काही सांगू शकेन. पण अगदी मनापासून सांगायला गेलं तर सध्या संपूर्ण जग ठप्प झालेलं आहे, अशा परिस्थितीत खेळाचं भविष्य काय असेल हा प्रश्नच आहे, असेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - क्रिकेटपटू 'अभिमन्यू' गरिबांच्या मदतीला धावला, घेतली १०० कुटुंबीयांची जबाबदारी
हेही वाचा - VIDEO : सेहवागची तीन तत्वे, प्रथम हात जोडणे, निवेदन देणे आणि शेवटी दे दणादण...