माउंट माउंगानुई - अनेक महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या न्यूझीलंडने मंगळवारी बे-ओव्हल मैदानावर भारताविरूद्धच्या तिसऱया आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी ईश सोधी आणि ब्लेअर टिकनरचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ख्राईस्टचर्चमध्ये भारत 'अ' बरोबरच्या दुसर्या अनधिकृत कसोटी सामन्यात सोधी आणि टिकनर न्यूझीलंड 'अ' संघाचा भाग होते.
हेही वाचा - VIDEO : क्रिकेटला गालबोट, अंतिम सामन्यानंतर भारत-बांगलादेशचे खेळाडू भिडले
न्यूझीलंड संघ त्यांच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. मिशेल सँटनर, टिम साउदी पोटदुखीमुळे तर स्कॉट कुगेलाईनला विषाणूचा ताप आहे. त्यामुळे या तिघांच्या समावेशाबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. ऑकलंडमधील दुसर्या एकदिवसीय सामन्यात सँटनर आणि कुगेलाईन खेळू शकले नव्हते.
या सर्वांव्यतिरिक्त कर्णधार केन विल्यमसनदेखील जखमी झाला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे केनला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने आणि पहिले दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाबाहेर बसावे लागले होते.
पाच सामन्यांची टी -२० मालिका ०-५ ने गमावल्यानंतर किवी संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघांत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल.
२१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये कसोटी मालिका सुरू होईल. दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाईल.