नवी दिल्ली - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पंजाब संघाने गतविजेत्या कर्नाटकविरुद्ध ९ गडी राखून विजय मिळवला. पंजाबच्या सिद्धार्थ कौलने या सामन्यात हॅटट्रिकसह एकूण ४ गडी बाद केले. सिद्धार्थशिवाय, प्रभासिरनने अर्धशतक झळकावत पंजाबला विजय सोपा केला.
मंगळवारी झालेल्या एलिट अ गटातील सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून कर्नाटक संघाला १२५ धावांत गुंडाळले. कर्नाटककडून रोहन कदमने सर्वाधिक ३२ धावा केल्या. तर इंडियन प्रीमियर लीगचा स्टार देवदत्त पडिक्कल केवळ १९ धावा करू शकला. कर्णधार करुण नायर अवघ्या १३ धावांचे योगदान देऊन माघारी परतला.
सिद्धार्थ कौलची हॅट्ट्रिक
१७व्या षटकात सिद्धार्थ कौलने षटकातील तिसर्या चेंडूवर रोहन कदमला बाद केले. यानंतर चौथ्या चेंडूवर अनिरुद्ध जोशीला तंबूत धाडले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अभिमन्यू मिथुनची विकेट घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. कर्णधार करुण नायरलाही कौलने बाद केले. या सामन्यात त्याने ४ षटकांत २६ धावा देऊन एकूण ४ बळी घेतले.
प्रभासिरनचे अर्धशतक
पंजाबच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर प्रभासिमरनने तुफानी फलंदाजी केली. त्याने ५२ चेंडूंत ८९ धावा फटकावल्या. यादरम्यान, त्याने ९ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारही ठोकले. प्रभासिमरनमुळे अवघ्या १४.४ षटकांत पंजाबला विजय नोंदवता आला. पंजाबकडून अभिषेक शर्माने ३० धावा केल्या. तर गुरकीरत सिंग ८ धावांवर राहिला.
हेही वाचा - वर्णद्वेषी शेरेबाजीबद्दल दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, ''अशांना कडक शिक्षा झाली पाहिजे''