लाहोर - पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताच्या वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. एका सोशल नेटवर्किंग अॅपला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने सांगितले, की तो आपला अनुभव सांगण्यास सदैव तयार असतो आणि भारतीय गोलंदाजांना प्रशिक्षित करण्याची संधी मिळाली तर तो अधिक खूष होईल.
भारतीय गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यास तयार आहे का असे विचारले असता अख्तर म्हणाला, "निश्चितच माझे काम माहिती देणे आहे. मी जे शिकलो आहे ते मी पुढे नेईन. मी सध्याच्यापेक्षा जास्त आक्रमक, वेगवान आणि अधिक बोलके गोलंदाज तयार करू शकतो."
तत्पूर्वी, अख्तरने कोरोनाविरूद्धच्या युद्धात निधी गोळा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान मालिकेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावावर अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी नकार दिला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मात्र अख्तरचे समर्थन केले होते.