तिरुवनंतपुरम - ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडीजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली आणि ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात जरी भारताचा पराभव झाला तरी भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. दरम्यान, या सामन्यानंतर शिवमने कोणत्याही मैदानावर मोठे फटके खेळण्यास तो सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात शिवमला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती. या संधीचा त्याने फायदा उचलत अर्धशतकी खेळी केली. सामन्यानंतर बोलताना शिवमने सांगितले, की 'मैदान मोठे होते. पण मी कोणत्याही मैदानावर षटकार मारू शकतो.'
शिवमने या सामन्यात पोलार्डला तीन षटकार खेचले. या विषयी बोलताना शिवम म्हणाला, 'सुरूवातीला फलंदाजीला आल्यानंतर मला धावा करण्यात संघर्ष करावा लागला. तेव्हा रोहित शर्माने संयमाने आणि मजबूत बाजू ओळखून खेळ करण्यास सांगितले. यामुळेच मी ही खेळी करु शकलो.'
अनुभवी खेळाडूकडून मला प्रेरणेची आवश्यकता होती. रोहितने ती प्रेरणा दिली. त्यानंतर मी षटकार मारला आणि त्यानंतर उत्स्फूर्तपणे खेळलो, असेही शिवम म्हणाला. तसेच त्याने खराब क्षेत्ररक्षणाबाबत चुका सुधारुन आम्ही पुढच्या सामन्यात पुनरागमन करु, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - रणजी करंडक २०१९-२० : पहिला दिवस, सर्व सामन्यांचा आढावा; वाचा एका क्लिकवर
हेही वाचा - VIDEO : विराट कोहलीने घेतलेला 'सुपरमॅन' झेल पाहिलात का?