रोहतक - 'प्रयत्न वाळुचे कण रगडिता तेलही गळे' असे म्हटले जाते. म्हणजे माणसाने कोणतीही गोष्ट करायचीच, असे ठरवले तर तो काहीही साध्य करू शकतो. असाच प्रत्यय १५ वर्षाची महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मासोबत आला आहे. फेब्रुवारीत महिलांच्या होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी शेफालीची भारतीय संघात निवड झाली आहे. या निमित्ताने तिच्या वडिलांनी शेफालीच्या संघर्षाची कहाणी सांगितली.
हेही वाचा - ४८ वर्षीय प्रविण तांबे आयपीएलबाहेर
कारकिर्दीच्या सुरूवातीला शेफालीला क्रिकेटसाठी अपार कष्ट घ्यावे लागले. इतरांनी वापरलेल्या अशा जुन्या बॅट्स आणि फाटलेले ग्लोव्ह्ज वापरून शेफालीने हा प्रवास सुरू केला होता. कोणीही हे ग्लोव्ह्ज पाहून हसू नये यासाठी ती हे ग्लोव्ह्ज लपवत असे. या सर्व गोष्टींचा उलगडा करताना तिचे वडील संजीव वर्मा यांना अश्रू अनावर झाले.
'एकेकाळी माझ्याकडे फक्त २८० रूपये खिशात होते. तेव्हा तिने नवीन साहित्यांसाठी हट्ट केला नाही. जुनं साहित्य वापरून ती बरेच महिने खेळत राहिली. तिने कधीही हार मानली नाही. मेहनतीमुळे ती इथपर्यंत येऊन पोहोचली', असे 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजीव वर्मा यांनी सांगितले.
विश्वकरंडक स्पर्धेत शेफालीने सर्वोत्तम कामगिरी करून देशाचे नाव उंचवावे, अशी आशा तिच्या आईने व्यक्त केली आहे.