मुंबई - केंद्र सरकारने देशातील मैदाने व स्पोर्टस कॉम्पलेक्स खेळाडूंना सरावासाठी सुरु करण्याची परवानगी दिली आहे. पण, यासाठी खेळाडूंना काही अटी व नियम घालून दिले आहे. याशिवाय क्रिकेटपटूंसाठी आयसीसीने व बीसीसीआयनेही काही दिशानिर्देश जारी केले आहे. याचे पालन करुन शार्दुल ठाकूरने आऊटडोर ट्रेनिंग सुरू केली आहे. लॉकडाऊनमध्ये आऊटडोअर ट्रेनिंग करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला.
शार्दुलने पालघरमधील आपल्या घराजवळील मैदानावर सराव सुरू केला आहे. यावेळी शार्दुलसोबत सराव करण्यासाठी काही स्थानिक खेळाडूही होते, ज्यात मुंबई रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेचाही समावेश होता. सरावानंतर पीटीआयशी बोलताना, दोन महिन्यानंतर आम्ही सराव केला आहे, खूप बरं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
शार्दुलने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी नोंदवली. तेव्हा त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत ११ एकदिवसीय, १५ टी-२० आणि एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
दरम्यान, खेळाडूंनी सरावासाठी स्वतःचा चेंडू व साहित्य आणले होते. ते साहित्य पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी सॅनिटाईज करुन घेतले. याशिवाय सरावासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूचे थर्मल स्क्रिनींगही करण्यात आले असल्याचे, पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - ईद साजरी न करता मजुरांना करणार मदत, मुंबईच्या क्रिकेटपटूचा निर्णय
हेही वाचा - कोरोनाचा फटका.. सरावादरम्यान शौचालयाला जाऊ शकणार नाहीत क्रिकेटपटू!