लाहोर - भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांच्यातील शाब्दिक चकमक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता आफ्रिदीने नव्या विषयाला हात घातला असून त्याने गंभीरबाबत एक विधान केले आहे.
आफ्रिदी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला, "एक क्रिकेटर म्हणून, एक फलंदाज म्हणून मला तो नेहमीच आवडतो. मात्र, माणूस म्हणून तो काही अशा गोष्टी करतो, ज्यावर तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची गरज नसते. त्याला काहीतरी समस्या आहे. त्याच्या फिजिओने नेहमीच हे सांगितले आहे."
पॅडी अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात गंभीरचा उल्लेख केला आहे. अप्टन हे भारतीय संघाचे माजी मानसोपचार आहेत. या पुस्तकाचा आफ्रिदीने संदर्भ दिला. ''मी ज्यांच्याबरोबर काम केले त्यांच्यापैकी गंभीर हा सगळ्यात कमकुवत आणि मानसिकदृष्ट्या असुरक्षित होता'', असे अप्टन यांनी म्हटले आहे.
या दोन खेळाडूंमधील मैदानावरील संघर्ष सर्वांनाच ठाऊक आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही या दोघांमधील मतभेद कमी झालेले नाही. 40 वर्षीय आफ्रिदीने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.